माजलगाव, दि.२५: जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने चार दिवस सावधानतेचा इशारा दिलेला आहे. वादळ, वारा, विजेसह पावसाचा अंदाज वर्तविलेला असल्याने शेतकरी, नागरिकांनी दि. २४ ते २८ एप्रिल २०२३ असे चार दिवस बाहेर फिरू नये, असे आवाहन तहसिलदार वर्षा मनाळे यांनी केले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी २४ एप्रिल रोजी दु.१ वाजता दिलेल्या सुचनेनुसार बीड जिल्ह्यामध्ये दि.२४ ते २६ एप्रिल ऑरेंज अलर्ट तसेच दि.२४, २७, २८ एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जाहिर केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा, वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच २४, २७, २८ जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमिटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता विजेच्या कडकडाटासह हलका पाउस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मजुर, जनतेने अशा वातावरणांमध्ये बाहेर फिरू नये, पाळीव बैल, म्हैस, गाय, शेळी, कुत्रा त्यांची व्यवस्था चांगली करून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसिलदार वर्षा मनाळे यांनी केले आहे.