राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (मंगळवारी) या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे.
राज्यगीत म्हणून निवडीसाठी अनेक गीतं सरकारसमोर होती. मात्र, त्यातून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत निवडण्यात आलं आहे. हे गीत आजही महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जातं होत. त्यानुसार अनेक सभासमारंभांमध्ये व राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते गायलंही जात असे. मात्र, त्याला राज्यगीताचा अधिकृत दर्जा नव्हता. तो अखेर मिळाला आहे.
महाराष्ट्र गीताचा इतिहास
‘महाराष्ट्र गीत’ अशी ओळख असलेलं जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. तसेच त्यास श्रीनिवास खळे यांनी हे संगीतबद्ध केले असून कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या बहारदार आवाजात हे गीत गायलं आहे.
