सुशिक्षित बेरोजगार कृषी अभियंत्याचे निवेदन
माजलगाव : तालुक्यातील वाघोरा येथील कृषी अभियंता असलेल्या सुशिक्षित बेरोजगार शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी (ता.३०) शेतात गांजा पीक लागवड व विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मी शुभम भास्कर माने रा. वाघोरा ता. माजलगाव जि.बीड येथील रहीवाशी असून सुशिक्षीत बेरोजगार शेतकरी आहे. माझ्या शेतात गांजा पिकाची लागवड करण्यास परवानगी दयावी. बीड जिल्हयातील पारंपारीक पिके कापूस, तुर, सोयाबीन, ऊस या पिकांना महागाईचा विचार करता आपल्या जिल्हयात योग्य भाव मिळत नाही. प्रामुख्याने ऊस या पिकाचा विचार केला तर जिल्हयातील कारखान्याचे ऊस गाळपाचे नियोजन नाही. मागील वर्षी आपल्या जिल्हयात अतिरिक्त ऊस लागवड झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि याही वर्षी तशीच परिस्थीती माजलगाव तालुक्याची झाली आहे. कारखान्याचे ऊसतोड ठेकेदार कमी प्रमाणात असल्यामुळे सन 2022 ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिण्यात लागवड केलेला ऊस अद्याप पर्यंत शेतात उभा आहे. त्यामुळे शेतक-याच्या ऊसाचे वजन घटत असून जिल्हयाच्या उत्पादनात घट होत आहे.
त्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक व अडवणूक लक्षात घेता कारखानदारांना आदेश दयावेत व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून गाळपास घेऊन जावा. व एफ.आर.पी. नुसार ऊसाला भाव देण्यात यावा. तसेच कापूस व सोयाबीन प्रति क्विंटल 10,000/- रुपये भाव देण्यात यावा. अन्यथा आमच्या सारख्या सुशिक्षीत बेरोजगार युवक शेतकऱ्यांना गांजा बहूउपयोगी पिक लावण्यास व विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, विनंती केली आहे.
