महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देणार असल्याची माहीती आहे. त्यांनी स्वतःच त्या बाबत आपली राजीनाम्याची इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त करत ‘आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन उर्वरित काळ चिंतन, मननात घालवायचा असल्याच’, सांगितलं आहे.
राज्यपालांनी आपली राजीनामा देण्याची इच्छा राजभवनाच्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली आहे. सध्या त्यांनी व्यक्त केलेल्या या इच्छेनंतर राज्यात चर्चा होत आहे. अनेक वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चर्चेत राहिले आहेत. आता काही नेत्यांकडून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या इच्छेवर टीकाही होत आहे. कारण राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करत असल्याने त्यांनी राजीनाम्याची इच्छा वा मागणी राष्ट्रपतींकडे व्यक्त करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.