सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपाचा परिणाम म्हणून किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानात घट झाली. एका मागून एक दोन पश्चिमी प्रकोप पुढील आठवड्यात सक्रिय होणार आहे. याचा परिणाम म्हणून दि.२७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्या बाबत वरिष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.
२० ते २६ जानेवारी आणि त्यानंतर २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावाखाली भारताचा उत्तर भाग आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथे या कालावधीत पाऊस पडू शकतो. पश्चिमी प्रकोप स्थितीमुळे समुद्रातून आर्द्रतेचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे २३ ते २७ जानेवारीदरम्यान पाऊस किंवा बर्फवृष्टीची शक्यता संभवते. २४ ते २६ जानेवारीदरम्यान याचा प्रभाव सर्वाधिक असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. यानंतर ही प्रणाली पूर्वेकडे सरकल्यावर राज्यात तिचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे. यामुळे थोडे ढगाळ वातावरणही निर्माण होऊ शकते.
गारा पडण्याची शक्यता
२६ जानेवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या परिणामांचा प्रभावही लक्षात येईल. बर्फवृष्टी तीव्र झाल्यास राज्यात जानेवारीचे शेवटचे दोन ते तीन दिवस थंडीची तीव्रता वाढू शकते, असाही अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार येथे गाराही पडू शकतात. मात्र याचा नेमका अंदाज २३ जानेवारीला रात्री पश्चिमी प्रकोप अधिक सक्रिय झाल्यानंतर उमटणाऱ्या पडसादानंतरच येऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार मात्र राज्यात २५ जानेवारीपर्यंत राज्यात कोरडे वातावरण असेल.