-
आर्थिक हितसंबंधाने तक्रारी करत असल्याचा आरोप
माजलगाव : येथील पत्रकार सुभाष साहेबराव नाकलगावकर विविध शासकीय कार्यालयात आर्थिक हितसंबंधाने तक्रारी करून पत्रकार पदाचा दुरुपयोग करत असल्याची तक्रार खुद्द आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी तक्रार केल्याचे समोर आले आहे.
काय आहे तक्रार :
आ.सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत, सुभाष साहेबराव नाकलगावकर (उपाध्यक्ष बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ) यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने आपण उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांनी चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. तक्रारदार नाकलगावकर यांनी श्री. पृथ्वीराज प्रकाशराव सोळंके, सौ. मंगलाताई प्रकाशराव सोळंके, रामेश्वर टवाणी, श्री. रामेश्वर ज्ञानोबा सोळंके यांच्या प्रॉपर्टीबाबत तसेच रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पीटलच्या परवान्याबाबत आक्षेप नोंदवले होते. सदर चौकशीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांनी संबंधित व्यक्तींची सुनावणी घेवुन उपलब्ध कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्याची आवश्यकता होती. परंतु त्यांनी केवळ श्री. विशाल भोसले, मुख्याधिकारी, न.प.माजलगाव यांचे म्हणणे ऐकुन अहवाल सादर केलेला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार हा आर्थिक हितसंबंधाने अनेक राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी यांच्या विरुध्द तक्रारी करतो. तक्रारदाराच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड, तहसील कार्यालय, माजलगाव, नगर परिषद, माजलगाव येथे दिसुन येतील. तक्रारदार हा जाणीवपुर्वक पत्रकार पदाचा दुरउपयोग करत आहे. ही सर्व वस्तुस्थिती असताना देखील उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांनी आक्षेप धारक व्यक्तींना कुठलीही संधी न देता अहवाल सादर केलेला आहे. सदर अहवाल चुकीच्या पध्दतीने सादर केला असून अहवाल स्वीकारू नये तसेच आक्षेप धारक व्यक्ती व संस्था यांना त्यांचे म्हणने ऐकुन घेवुन अहवाल सादर करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांना आदेशित करावे असे म्हंटले आहे.
