राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आता वाढणार असून काही सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देखील असणार आहेत. याबाबत राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडूंना निश्चितच मोठा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. खेळाडूंना घडविण्यासाठी राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डेटाबेस आता तयार केला जाणार असल्याने भविष्यात चांगले खेळाडू तयार करण्यास मदत होणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय दर 2 वर्षांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे जाहीर केले.
राज्यात खेळाच्या विकासासाठी शासनातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा व प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातील. यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे”, राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळेस फडणवीस म्हणाले.