कोरोणा सारख्या संकटातून सर्वत्र व्यवसाय, उद्योगांना घरघर लागली होती. त्यातच सरकारच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, दुसरीकडे मद्यविक्रीचा आलेख दरवर्षी वाढताना दिसून येत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत तब्बल 29 कोटी 16 लाख रुपयांची मद्यविक्री झाली. यातून तळीरामांनी शासकीय तिजोरीत कोट्यवधीची भर घातली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल पावने तेरा कोटी रुपयांचा अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. हे विशेष.सरकारने नोटबंदी आणि जीएसटी हे दोन धोरणे अमलात आणल्यानंतर देशभरातील विविध व्यवसाय डबघाईस आले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. मात्र, दुसरीकडे शासकीय तिजोरीत भर टाकण्यासाठी तळीरामांना पुढाकार घेतल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
अशी झाली वाढ !
एप्रिल महिन्यांपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षातील केवळ सातच महिन्यांत तळीरामांनी देशी 38 लाख 22 हजार 914 बल्क लिटर, विदेशी 8 लाख 30 हजार 223 बल्क लिटर, बिअर 9 लाख 68 हजार 131 बल्क लिटर आणि वाईन 26 हजार 245 बल्क लिटर रिचवून तब्बल 29 कोटी 16 लाख 18 हजार 654 रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला आहे.