शिवजन्मोत्सव निमित्त उद्या पार पडणार सामूहिक विवाह सोहळा – बाळू ताकट

Spread the love

– श्री बालाजी व पद्मावती देवी सोबत दिव्य लग्नाची अनुभुती भाविकांना मिळणार

माजलगाव, दि.१८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माजलगाव शिवजन्मोस्तव समितीच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच १२ दिवसीय शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यात श्रीमद् भागवत कथा, कीर्तन महोत्सव व तिरुपती देवस्थान येथील श्री बालाजी कल्याणम् महोत्सव पार पडत आहेत. त्यातच आज (दि.१९) बुधवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. तसेच याप्रसंगी प्रथमच श्री बालाजी व पद्मावती देवी सोबत दिव्य लग्नाची अनुभुती भाविकांना मिळणार आहे. या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बाळु ताकट यांनी केले आहे.

 

माजलगावकरांना शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने यावर्षी १२ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यामधे दि.८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राधास्वरुपा अनन्या दीदी शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा, तीन दिवसीय कीर्तन महोत्सवात अनुक्रमे ह .भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. बाळू महाराज गिरगांवकर, ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन पार पडले. तर दि.१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान तिरुपती देवस्थान येथील बालाजी महोत्सव निमित्त दोन दिवस सुप्रभात सेवा, सहस्त्र नामार्चन, प्रभोद सेवा, अभिषेक, श्रृंगारपुजा, महाभोग व आरती, दिपोत्सव व झुलोत्सव, महाआरती, मुल्यमूर्ती बालाजी महाअभिषेक, तोमाला वस्त्र सेवा, हवन, लक्ष तुलसी अर्चना आदी धार्मिक विधी पार पडले. आज दि.१९ बुधवारी दुपारी ४ वाजता हनुमान मंदिर, हनुमान चौक येथून भगवान बालाजी यांचा पालखी सोहळा निघणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मंगलनाथ मैदान येथे येणार आहे. सायं.६ वाजता श्री बालाजी व पद्मावती यांचा विवाहाची अनुभूती भाविकांना मिळणार असून लगेच सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी या विवाह सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू- वराना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बाळु ताकट यांनी केले आहे.

*पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे*


तिरुपती देवस्थान येथील श्री बालाजी महोत्सव प्रथमच माजलगाव शहरात पार पडत आहे. त्यानिमित्त आज (दि.१९) रोजी दुपारी शहरातील हनुमान मंदिर हनुमान चौक येथून पालखी सोहळा निघणार आहे. या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवजन्म समितीचे बाळू ताकट यांनी केले आहे.

Leave a Reply