मूग खरेदी घोटाळा; अध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल !

Spread the love

अंबाजोगाईच्या संस्थेकडून माजलगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक

झटपट बातमी –

शितल कृषी निविष्टा सहकारी संस्था मर्या.गिरवली ता.अंबाजोगाई या संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळाने जाणिवपूर्वक माजलगाव येथील शेतकऱ्यांचा मूग खरेदी करून ३७ लाख ६० हजार ९२० रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश विठ्ठल आपेट यांच्यासह १३ संचालकांवर गुन्हे दाखल झाले असून प्रकाश आपेट यांना अंबाजोगाईतून अटक केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शितल कृषी निविष्टा सहकारी संस्थेने कामामध्ये अनियमितता करून गैरव्यवहार करण्याच्या दृष्टीने नोंदणी करणे, शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये बदल करणे, शेतकर्‍यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता स्वत: व्यवस्थापक असलेल्या संस्थेमध्ये खाते उघडून गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. शेतकर्‍यांना अदा करण्यात आलेल्या खरेदीच्या वजनकाटा पावत्या पणन महासंघाने अदा केलेल्या नसुन त्या संस्थेने स्वत: छपाई करून घेतल्याचे चौकशी अहवालातील निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातून संस्थेने सर्व कामकाज बेकायदेशिर करून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे पोलीस तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

या सर्व अनियमिततेस संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळ जबाबदार असुन त्यांच्या या कृत्यामुळे माजलगाव तालुक्यातील संबंधीत ११२ शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. याप्रकरणी शितल कृषी निविष्टा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश विठ्ठल आपेट, सचिव दत्तु दगडू आपेट, सदस्य विठ्ठल मारोती आपेट, प्रविण प्रकाश आपेट, अमोल राजाभाऊ कदम, नागनाथ रामभाऊ तोडकर, महादेव भानूदास भोईनवाड, बाळासाहेब दत्तात्रय आपेट, पंडित नामदेव काकडे, बाबुराव आबाराव आपेट, संगिता प्रकाश आपेट, प्रयागबाई विठ्ठल आपेट, गितांजली प्रकाश आपेट, खरेदी केंद्र प्रमुख, कर्मचारी व इतर संबंधितांनी जाणिवपूर्वक मुग खरेदी करून ३७ लाख ६० हजार ९२० रूपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपहार केलेल्या रकमेपैकी ९ लाख ४ हजार २२९ रूपये मिळालेले आहेत. उर्वरीत २८ लाख ५६ हजार ६९१ रूपये तक्रारदार शेतकर्‍यास न मिळाल्याने माजलगाव तालुक्यातील संबंधीत शेतकर्‍यांनी अध्यक्ष, संचालक मंडळ व इतरांवर तक्रार केली. त्याअनुषंगाने बीड येथील जिल्हा पणन अधिकारी विलास मारोतीराव सोमारे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक, संचालक मंडळ व वित्त संस्थेशी संबंधीत अधिकारी, कर्मचार्‍यांविरूध्द कलम ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भांदवी प्रमाणे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माकने करीत आहेत.

Leave a Reply