झटपट बातमी –
वैयक्तिक जलसिंचन विहीरी करिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जलसिंचन विभागातील दप्तर कारकूनास लाच लुचपत विभागाने शुक्रवारी (दि.२३) रंगेहाथ पकडले. शेख वसीम शेख शफीक असे त्या दप्तर कारकुनाचे नाव असून, तो उप विभागीय अधिकारी कार्यालय, शेतचारी अस्तरीकरण उप विभाग क्र १०, (जलसंपदा विभाग) माजलगाव येथे कार्यरत होता.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांच्या नावे मौजे मोठेवाडी ता.माजलगाव गट नं. २७७ मध्ये शेत आहे. सदरचे शेताचे अनकमांड प्रमाणपत्र (महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीरी करिता नाहरकत प्रमाणपत्र) मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरून तक्रारदार यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष ३ हजार ५०० रू. लाचेची मागणी दप्तर कारकून शेख वसीम यांनी करून तडजोड अंती ३ हजार रू. स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार आज दि.२३ शनिवारी मोरेश्वर टी हाऊस समोर रोड वर, फुले पिंपळगाव चौक, केसापुरी कॅम्प, माजलगाव येथे ३ हजाराची लाच स्विकारताना लाचेच्या रकमेसह पकडले व ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.बीड शंकर शिंदे यांच्यासह सापळा पथकात भरत गारदे, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे ला. प्र. वि.बीड यांनी केली.