झटपट बातमी :
रोजच्या प्रमाणे कामकाज आटोपून पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरला तीन चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना अंबाजोगाईत शुक्रवारी (दि.१६) रात्री घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी दि.१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून जात असताना मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरटय़ांनी त्यांना अडविले. पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. तसेच त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील ३९ लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.