जादुटोनाच्या संशयावरून बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

झटपट बातमी :-

जादुटोणा, भानामती केल्याचा चर्चा करून सहा जणांची बदनामी करून त्यांचे जगणे अवघड केल्याच्या आरोपावरून पाच जणांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरपगाव येथील धनंजय राजाराम जाधव, मंदाकिनी धनंजय जाधव, ज्ञानेश्वर बळीराम जाधव आणि कानडी बदन (ता. केज) येथील वैष्णवी साखरे व बाळासाहेब साखरे यांनी सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाबुराव एकनाथ बोडके यांच्यासह सहा जणांना हनुमान मंदिरासमोर बोलावले. तिथे बाळासाहेब साखरे याने वैष्णवीच्या डोळ्यात लिंबू पिळले आणि तुझ्यावर भानामती, करणी, जादूटोणा कोणी केला असे धमकावत विचारले. त्यावर वैष्णवीने अंगात आल्यासारखे करत बाबुराव बोडके, शशिकला बाबुराव बोडके, दिलीप रामभाऊ माळी, मीरा दिलीप माळी, विश्वनाथ आश्रुबा पांचाळ यांनी माझ्यावर करणी, जादुटोणा, भानामती केली असल्याचे सांगितले.
त्यावरून धनंजय जाधव, मंदाकिनी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, वैष्णवी साखरे आणि बाळासाहेब साखरे यांनी वरील सहा जणांना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देऊन त्यांची बदनामी केली. यामुळे लोक संशयाने बघत असल्याने आमचे सर्वांचे जगणे अवघड झाले अशी तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बाबुराव बोडके दिली. या फिर्यादीवरून पाचही आरोपींवर अघोरी प्रथा, जादूटोणा, प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक पडवळ करत आहेत.

Leave a Reply