कुणबी नोंदी आढळल्या; त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या !
माजलगाव, दि.२१: मागील दोन महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत आ.प्रकाश सोळंकेना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावर आ.सोळंके यांनी आपल्या चुकीच्या वक्तव्य बाबत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन माफी मागितली होती. त्यावर ही समाजाचा रोष कायम असल्याचे त्यांना जानऊ लागले. हा रोष कुठे तरी कमी करण्यासाठी चक्क रविवारच्या दिवशी उपविभागातील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र तात्काळ वाटप करावे, कुणाची अडवणूक होता कामा नये अशी आग्रही मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. यातून ते खरंच समाजाच्या प्रश्नावर गंभीर झाले आहेत का ? की, स्वतः वरील रोष कमी करू पाहत आहेत, अशी कुज बुज होत आहे.
माजलगाव उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ३३०० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात केवळ अद्याप पर्यंत १५०० कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. त्यात ही मिळालेल्या प्रमाणपत्र करिता हेलपाटे मारावे लागत असल्याने प्रशासनाकडून अडवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आ.प्रकाश सोळंके ह्यांनी नोंदी मिळालेल्या समाज बांधवांना विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले. आ.प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणी आज (दि.२१) रविवारी शासकीय सुट्टी असताना ही उपविभागीय कार्यालय गाठले, उपविभागीय अधिकारी निलिमा बाफना यांना बोलाऊन घेत. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना तात्काळ वाटप करावे व तसेच लोकांची प्रमाणपत्र बाबत अडवणूक होता कामा नये अशा सूचना दिल्या.