-
नो रिस्क; म्हणत … उमेदवाराकडून घोडेबाजार
माजलगाव, दि.१५ : तालुक्यात ग्रामपंचायत प्रचार अंतिम टप्यात आला आहे. गल्लीतील स्पर्धेमुळे एक मतसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गावातील प्रचार तापलेला असतानाच आत्ता बाहेरगावी रोजगार, कामाच्या शोधात गेलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी व आपल्याच लवाजम्यात दाखल करून घेण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
माजलगाव तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या निवडणुकी करिता १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यातच प्रचार हा अंतिम टप्यात आला असून उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र आत्ता आपल्याला विजयासाठी एक एक मत किती महत्त्वपूर्ण आहे. याचे अंदाज बांधत गावातील जे लोक कामानिमित्त पुणे, मुंबई यासह इतरत्र गेलेले आहेत. त्यातच माजलगाव तालुक्यातील बहुतांश लोक हे ऊसतोड करण्यासाठी कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेश या राज्यासह पर जिल्यात जातात. त्यांना मतदानासाठी आणण्याकरिता दोन्ही बाजूच्या उमेदवाराची मोठी चुरस लागली आहे. त्यांच्याशी रोज संपर्कात राहून मतदानासाठी येण्याची गळ घातली जात आहे. बाहेरच्या मतदारांना गावाकडे आणण्यासाठी त्यांचा संपूर्ण खर्च ज्यात ट्रॅव्हल्स बुकींग, एखाद-दुसऱ्या मतदारांसाठी रेल्वे, बसेसची तिकीटे बुकींग करण्यापर्यंतच्या नियोजनाला गती आली आहे. केवळ येण्याचेच नव्हे तर परत जाण्याची सोयसुद्धा केली जाण्याचे नियोजन आखले जात आहे. विरोधकांच्या हाताला एकही बाहेरचा मतदार लागू नये याची खबरदारी म्हणून मतदारांसाठी सेवासुविधांच्या पायघड्या घालण्यात निवडणूक लागलेल्या गावागावात रस्सीखेच सुरु झाली आहे.
एक मत, सत्तेचा पत्ता कापेल
गावातील मतदाराच्या मानसिकतेचा अंदाज बांधता येत नाहीत. यामुळे एकेका मताला मोठे महत्व असते. एक-दोन मतांनी एवढा काय फरक पडतो, असे म्हणणारेही असतात. परंतु एक-दोन मतांनीच पराभव झालेल्यालाच त्याची खरी किंमत कळालेली असते. खुद्द उमेदवार नो रिस्क म्हणून … बाहेर गावी असलेल्या मतदारांना मोठ्या सुखसुविधा देऊन मतदान करून घेण्यासाठी आर्थिक ताकत लावत असल्याचे दिसून येत आहे.