फुले पिंपळगाव येथील घटना
माजलगाव, दि.११: तालुक्यात मागील आठवडाभरापासून बिबट्याने अनेक गावात हैदोस घातला आहे. त्यातच आज (गुरुवारी) सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान फुले पिंपळगाव येथील उंबरे वस्तीवर महिला काम करत असताना बिबट्या झडप मारण्याच्या तयारीतच होता, देव बलवत्तर म्हणून पाळीव कुत्र्याने प्रतिकार केल्याने सुदैवाने त्या महिलेचे प्राण बचावले.
माजलगाव तालुक्यातील मंगरूळ, राम पिंपळगाव, एकदरा, माळेवाडी (सुलतानपूर) ह्या गावात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. यात शेळ्या, मेंढ्या, गाय व वगारीचा फडशा पाडला आहे. यात शेतकऱ्यांचे जीव भावाचे पशुधन दगावले असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यात अद्याप मनुष्यहानी झाली नाही. मात्र आज दि.११ गुरुवारी पहाटे फुले पिंपळगाव शिवारात असलेल्या उंबरे वस्तीवर हरिभाऊ उंबरे व माणिकराव उंबरे हे वास्तव्यास आहेत. त्याच्या कुटुंबातील महिला दररोज प्रमाणे पहाटे उठून दैनदीन काम करत होती. त्याच वेळी तिथे आलेल्या बिबट्याने सदरील महिलेवर हल्ला चढवत झडप मारणारच, तितक्यात तिथे असलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याच्या दिशेने हल्ला चढवला. त्यामुळे त्या ठिकाणाहून बिबट्याने धूम ठोकली अन् देव बलवत्तर म्हणून उंबरे कुटुंबातील ती महिला बछावली.
तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे तर अर्धा डझन गावापर्यंत बिबट्याच्या हल्याचे लोन पोहचले आहे. परिणामी प्रशासन व वन विभागाच्या विरुद्ध नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. आत्ता तरी वन विभागाने तात्काळ पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, जेणे करून भविष्यात होणारी पशुधन व मनुष्य हानी टळेल.
Advt