माजलगावकरासाठी अभिमानास्पद गोष्ट !
माजलगाव, दि.१०: संत तुकारामाच्या पादुका उचलून डोक्यावर घेतल्यानंतर देहू ते पंढरपूर असा विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी सोहळा सुरू होतो. दरवर्षी पादुका उचलण्याचा मान माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके – जहागीरदार घराण्याला येतो. सोळंके यांच्या चार वाड्यापैकी यंदाचा मान प्रल्हाद दादासाहेब सोळंके यांच्या वाड्याला आला होता. संत तुकारामाच्या पादुका उचलण्याचा मान माजलगाव तालुक्याला असल्याने ही माजलगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आज दि.१० जून २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मानकरी असलेल्या सोळंके – जहागीरदारच्या गंगामसला येथील बहुतेक सोळंकेनी देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात गर्दी केली होती. गंगामसला येथील सोळंकेचे चार वाडे आहेत. त्यात चौथाई, अंदोबा, माळकरी व थोरला तरफ अशी नावे वाड्याची आहेत. यावर्षीचा मान चौथाई वाड्याला मिळाला असून पादुका या वाड्याचे प्रमुख प्रल्हाद दादासाहेब सोळंके यांना मिळाला होता. या वाड्याचे प्रमुख प्रल्हाद दादासाहेब सोळंके यांनी आज दि.१० शनिवारी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम यांच्या पादुका उचलल्या व तदनंतर पालखी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
पादुकांची संपूर्ण जिम्मेदारी सोळंके कुटुंबियावर
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पादुका रथावर जी मंडळी विराजमान असते, ती सर्व गंगामसला येथील सोळंके – जहागीरदारच असतात. इतर आडनावातील लोकांना नसावा, ही सोळंके राजघराण्यासाठी अभिमानाची बाब आहे. सोळंके – जहागीरदार यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुका उचलून आज सुरू झालेल्या या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात आहे. हा सोहळा पंढरपूर येथे जावून काला झाल्यानंतर संपतो. मात्र त्यानंतर सुद्धा तुकारामांच्या पादुका पंढरपूर येथून देहू येथे पोहचत नाहीत, तोपर्यंत पादुकांची पूर्ण जिम्मेदारी गंगामसल्याच्या सोळंके – जहागीरदार यांचीच असते.
कसा चालत आला हा मान ?
मराठवाड्यात निजामशाहीचे आधिपत्य होते. तर पुणे भागात इंग्रजी राजवटीच्या अंमल होता. पुणे पंढरपूर भागांत कुठेही पक्के रस्ते नव्हते. धड पायवाटा सुद्धा नव्हत्या. शिवाय देशात लोकशाही नसल्याने, पराया मुलुखात फिरणेही अवघड होते. अशा परिस्थितीमुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपूर वारी करण्यासाठी कोणीही धजावत नव्हता. त्यावेळी गंगामसला येथील रावसाहेब मालीपाटील, घनश्याम बापू, दादामहाराज, सिताराम दादा, गोपाळभाऊ सोळंके जहागिरदार यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून पंढरपूरची वारी केली आणि या सोहळ्यात कधीही खंड पडू दिला नाही.
सोळंके यांनी केवळ श्री संत तुकाराम महाराजांवरील श्रद्धेपोटी त्या काळात न डगमगता हें कार्य नियमितपणे पार पाडले. संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेत न चुकता नित्यनियामाने पंढरपूरची वारी केली. त्यांच्या नंतरही हे कार्य पार पडले. पुढे या वारीचे रुपांतर खूप मोठ्या सोहळ्यात झाले. मात्र गंगामसला येथील सोळंके – जहागिरदार यांचा पालखीचा मान तसाच सुरू राहिला. काळाच्या ओघात पुढे या पालखी सोहळ्याचा मान गंगामसला गावातील सोळंके जहागिरदार यांच्या चारही वाड्यात विभागला गेला.