शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेरणी योग्य पाऊस कधी होणार; पंजाब डक यांचा अंदाज

Spread the love

झटपट बातमी :

किल्ले धारुर : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यात ४ जून पासून पावसाला सुरुवात होईल. तर ८ जून पर्यंत राज्य व्यापले जाणार असून पेरणी योग्य पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डक यांनी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या नजरा आत्ता आभाळाकडे लागल्या असून उत्सुकता खरीप हंगाम तोंडावर लागली आहे. पाऊस काळ कसा असेल ? त्यानुसार पीक घेऊन चांगलं उत्पन्न मिळावे, कापूस, सोयाबीन या खरीपाच्या महत्वाच्या पिकांबाबतीत शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करता यावे. याकरिता धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना हवामान तज्ञ पंजाब डक म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली. येत्या दि. ४ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून दि. ८ जून पर्यंत राज्य व्यापले जाणार आहे. बहुतांश भागात पेरणी होईल असे म्हटले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकून घेण्याचं आवाहन केले.

सोयाबीन पिकबाबत मार्गदर्शन –

कृषी शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी सोयाबीन पिका संबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सोयाबीन बी.बी.एफ.पद्धतीने घेतलं तर चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना एकाच वाणाच्या आग्रह न धरता, जे सहज उपलब्ध होइल तेच बीज प्रक्रिया करत पेरणी करण्याचे सांगितले.

कापूस पिकाबाबत मार्गदर्शन –

कापूस शास्त्रज्ञ रामेश्वर चांडक यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की, कापसाचे झाड नाही तर उत्पन्न वाढीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. यासाठी अंतर मशागत,खत नियोजन करणं आवश्यक असल्याचे सांगून याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी, राजाभाऊ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती मंगेश तोंडे, उपसभापती सुनील शिनगारे, तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे, बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सोळंके यांची उपस्थिती होती.

Leave a Reply