माजलगाव, दि.२३ : तालुक्यातील पात्रुड येथील महावितरण (एम.एस.ई.बी.) कंपनीकडुन ग्रामस्थांना विजेच्या बाबतीत प्रचंड त्रास दिला जात आहे. याबाबत वारंवार महावितरणकडे लक्ष वेधले असता ही भोंगळ कारभार सुधारण्याचे कसलेच पाऊल महावितरणकडून टाकले जात नाही. यामुळे संतप्त पात्रुड ग्रामस्थांनी महाविरण कंपनीच्या विरोधात गावातील एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर आज दि. २३ मंगळवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येने व व्यापारी दृष्ट्या मोठे असलेले पात्रुड गाव महावितरणच्या समस्या बाबत मागील अनेक दिवसांपासून त्रस्त आहे. महावितरण कंपनीच्या कार्यालयास निवेदन, उपोषण, रस्ता रोको करूनही विजेच्या समस्या संदर्भात वरिष्ठानकडून कोणतेही ठोस मार्ग काढले जात नाही. यामुळे ग्रामस्थ प्रचंड वैतागले असून त्याला वाचा फोडण्यासाठी पात्रुड ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पात्रुड महावितरण कार्यालयाच्या समोर आज (२३) रोजी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनातून त्यांनी महावितरणकडे आर.डी.एस.एस. अंतर्गत गावठान फिटर योजनेस मंजुरी देउन कामास तात्काळ सुरूवात करावी. गावात २२ स्ट्रक्चर
आहेत त्यास ६६ डब्यांची आवश्यकता असुन सध्या ४९ डब्बे असल्याने सारखेच जळत आहेत, त्यात आणखी २५ चे नविन २० डब्बे द्यावेत. संपुर्ण गावात असलेल्या स्ट्रक्चरला नविन केबल व किटक्याट बसवावेत. स्ट्रक्चरच्या अंतर्गतचे काम करावे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलाण्यात याव्यात. लोंबकाळणा-या तारांचा बंदोबस्त करावा, वाकलेल्या, क्रॅक पोलच्या जागी नविन पोल लावा, मिटर देण्यास विलंब लागत असुन कोटेशन धारक लोकांना तात्काळ मिटर द्यावे. अंदाजे बिल येत असल्याने त्याची दुरूस्ती करून कोटेशन धारकास बील कमी करून द्यावे, वाढत्या लोकसंख्येनुसार गावाला नविन तीन स्ट्रक्चरला मंजुरी द्यावी व शेतकऱ्यांना शेतातला ट्रान्सफॉर्म जळल्यानंतर २४ तासाच्या आत बदलून देण्यात यावा.
या मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनात माजी सरपंच एकनाथ मस्के, माजी सरपंच नजिर कुरेशी, माजी उपसभापती लतिफ मोमीन, माजी सरपंच जब्बार शेख, माजी उपसरपंच घनश्याम भुतडा, माजी उपाध्यक्ष ख.वि.संघ वहिद पटेल यांचेसह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.