माजलगाव, दि.२०: तालुक्यातील सादोळा शिवारात बुधवारी रात्री वीज कोसळून तीन बैल दगावल्याची घटना घडली. सुदैवाने यात मनुष्य हानी झाली नसून एक म्हैस, एक गोरे बचावले आहे. तसेच पवारवाडी वीज कोसळून दोन बैल दगावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील तीन चार दिवसापासून आभाळ भरून येत आहे. तसेच वादळी वारा व विजाचा कडकडाट सुरूच आहे. यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात काल दि.१९ बुधवारी रात्री सादोळा येथील शेतकरी पवन सुभाषराव सोळंके हे रोजच्या प्रमाणे त्यांच्या शेतातील गोट्यावर लिंबाच्या झाडाखाली जनावरांना रात्री ८ वाजता चारा टाकून घराकडे आले होते. दरम्यान रात्री विजाचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. त्यात त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली झाडाखाली असलेली तीन बैल जागीच दगावली. रोजच्या प्रमाणे पवन सोळंके हे सकाळी धार काढण्यासाठी शेतात गेले असता बैल दगावलेल्या अवस्थेत दिसून आली तसेच लिंबाच्या झाड ही वीज कोसळल्याने होरपळले होते. सुदैवाने लिंबाच्या झाडाच्या बाजूला असणारी एक म्हैस, एक गोर बचावले. यात सोळंके यांचे २ लाख रुपयांचे नुकसान पशुधनाच्या मृत्युने झाले आहे. तसेच पवारवाडी येथील सोमेश्वर सुदामराव चव्हाण यांच्या शेतात ही वीज कोसळून दोन बैल दगावले असून त्याने १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी महसूल विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित शेजुळ यांनी भेट दिली आहे.