माजलगाव बाजार समिती निवडणूक
माजलगाव, दि.१९: माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आ.प्रकाश सोळंके यांनी तालुका पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांना आवाहन देऊ पाहणारे भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ संपेना गेले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मोर्चेबांधणी करण्यात सध्या तरी आ.सोळंके आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

माजलगाव तालुक्यात सहकार क्षेत्रावर आ.प्रकाश सोळंके यांचे मागील पंधरा वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे. बाजार समिती व खरेदी विक्री संघावर मागील दोन दशकांपासून एकछत्री अंमल आ.सोळंकेचा आहे. यावेळी होऊ घातलेल्या खरेदी विक्री संघ व बाजार समिती निवडणुकीत आ.सोळंकेच्या विरोधात भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी दंड धोपटले आहेत. मात्र आ.प्रकाश सोळंके यांनी एकसुत्री आखणी करत माजलगाव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती, ताड्यांचा दौरा करून पिंजून काढला आहे. त्यात भाजपाकडून मात्र मोहन जगताप व रमेश आडसकर यांच्या गटात जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ काही संपेना गेले आहे. उद्या दि.२० एप्रिल २०२३ हा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यापासून चाललेले जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ उद्या यशस्वी होईल का ? अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.
