-
दिंद्रुड पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
माजलगाव, दि.१८: तालुक्यातील नित्रुड येथील १५ वर्षीय गुलाम महंमद मुर्तुजा शेख याने गळफास घेऊन आत्महत्या केली नाही. तर त्यास ओढणीने गळा दाबून खून केला असल्याची तक्रार वडील मुर्तुजा शेख यांनी दिंद्रुड पोलिसात दिली. याप्रकरणी तीन जनाविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत गुलाम महंमदचे वडील मुर्तुजा शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा गुलाम, हुजेफा व मुलगी सुमरेन हे आज (दि.१८) सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान माझे सासरे उस्मान कासम शेख यांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मुलगी सुमरेन व मुलगा हुजेफा हे घरी माझ्याकडे धावत पळत आले. मला सांगू लागले की, कैलास उर्फ पिंटू शिवाजी डाके व इतर दोघे जन दत्ता माणिक डाके यांच्या शेतात गुलाम महंमद भैय्याला खाली पडून मारहाण करत असून सरपन आणण्यासाठी नेलेल्या ओढणीने गळा आवळत आहेत. यावर मी दत्ता माणिक डाके यांच्या शेतात पायी चालत गेलो असता माझा मुलगा गुलाम महंमद याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी माझ्या अगोदर त्या ठिकाणी सुलतान उस्मान शेख व त्याचे वडील उस्मान शेख हे हजर होते. त्यावर त्यांनी मला सागितले की, महादेव सुंदरराव डाके हा मला पाहून पळून गेला तर कैलास उर्फ पिंटू डाके व हनुमंत वानखेडे हे गुलाम यास लिंबाच्या झाडाला लटकवत होते. मला पाहून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
या प्रकरणी मयत गुलाम महंमद शेख (वय १५ वर्षे) यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी कैलास उर्फ पिंटू शिवाजी डाके, महादेव सुंदरराव डाके ( दोघे रा. नित्रुड ता.माजलगाव), हनुमंत वानखेडे (रा. टालेवाडी ता. माजलगाव) यांच्या विरुद्ध वडील मुर्तुजा बशीर शेख यांनी दिंद्रुड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.पी. खोडेवाड हे करत आहेत.
