Beed २७ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची प्रतीक्षा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ठरले वेळकाढू धोरण

Spread the love

अतिवृष्टीचे २० कोटी अद्याप ही जमा नाही; संततधार बाधीत केवळ सलाईनवर

बीड, दि.१७: माजलगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधीत २७ हजार  तर जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. तहसिल कार्यालय स्तरावरून शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील परळी व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम आठवडा भरापूर्वीच जमा झाली आहे. मात्र माजलगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व सततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान देण्याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च अखेर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र मात्र केवळ शासन स्तरावरून केवळ अतिवृष्टीने नुकसान झालेली माहिती मागवली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाधीत शेतकऱ्यांची माहिती कळवली. परंतू शासन स्तरावरून तोकडा निधी जिल्ह्याला दिला. त्यामुळे केवळ जिल्ह्यातील गेवराई व परळी तालुक्यातील अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मागील आठवडाभरापूर्वी बँक खात्यात जमा झाली आहे. यातून जिल्ह्याच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या मतदार संघातील अनुदान वाटप झालेले नाही. एकट्या माजलगाव तालुक्यातील तालखेड, किटी आडगाव, गंगामसला, मंजरथ या चार महसूल मंडळातील २७,३६४ शेतकऱ्यांचे १९ कोटी ४६ लाख १६ हजार २२८ रुपये अद्याप ही शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले नाहीत.

संततधार बाधीत शेतकरी सलाईनवर ..!

माजलगाव तालुक्यातील माजलगाव, नित्रुड, दिंद्रुड या महसूल मंडळांना अतिवृष्टीमधून वगळले असून संततधार पावसामुळे बाधीत म्हणून टाकले आहे. मात्र संततधार पावसाने बाधीत शेतकऱ्यांचे माहिती तहसिल कार्यालय स्तरावरून संकलित केली आहे. परंतू शासन स्तरावरून अद्याप याची ना माहिती मागवली गेली, ना त्या शेतकऱ्यांच्या अनुदान देण्याबाबत ही हालचाल केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे घोषणा पोकळ ठरली जात असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply