माजलगाव, दि.१४: माजलगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑईल मीलला आग लागली. ही आग आज संध्याकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
माजलगाव तालुक्यातील केसापुरी शिवारात असलेल्या माजलगाव – गेवराई रोडवर रमदयाल मुंदडा यांचे मुंदडा उद्योग समूह आहे. या ठिकाणी त्यांची दालमिल व ऑईल मिल आहे. आज (दि.१४) शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक ऑईल मिलला आग लागली. या आगीत सरकी असलेले हजारो पोते जळून खाक झाली आहेत, तसेच लाखो रुपयांचा बारदाना जळून खाक झाला आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग इतकी भीषण असल्याने ती वीजवण्यासाठी माजलगाव नगर परिषदचे अग्निशमन दल, मानवत नगर परिषदचे अग्निशमन दल, गेवराई नगर परिषदचे अग्निशमन दल, बीड नगर परिषदचे अग्निशमन दल, धारुर नगर परिषदचे अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न होत आहेत. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नसून घटनास्थळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात होते.
आगीची माहिती कळताच घटनास्थळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांच्यासह व्यापारी व नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती.