महावितरण मधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
माजलगाव, दि. ५ : येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व कनिष्ट सहाय्यक हे दोन कर्मचारी जुने मिटर बदलून नवे मिटर बसवण्याच्या बदल्यात १३ हजाराची लाच स्विकारातांना बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या रंगेहात जाळ्यात अडकले आहेत.
माजलगाव येथील महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपीक रामा बन्सीधर लोखंडे व कनिष्ट सहाय्यक ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोन कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बदलीन नवीन मिटर बसवले सांगून जास्त बिल न देण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती १३ हजार रूपये स्विकारतांना आज दि.५ बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात लाच स्विकारतांना पकडले. त्यामुळे महावितरणमध्ये एकच खळबळ माजली असून महावितरणच्या भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप पाटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे आदींनी केली आहे.