तालुक्यातील लवुळ येथील घटना
माजलगाव, दि.२६: तालुक्यातील लवुळ क्र.२ येथील गणेश तांडा येथील दोन महिलेवर रानडुकराने हल्ला करत चावा घेतल्याने गंभीर जखमी झाल्या. ही घटना घडली गुरूवारी घडली असून एका महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. सदरील महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची टोळी लवुळ क्र.२ येथील श्रीरंग कुरे यांच्या शेतात ऊसतोडणीसाठी आली होती. यातील ऊसतोड मजुरा महिला जयश्री बाबुराव मुजमुले ( वय ४०) रा.कारी (ता.धारूर) गुरुवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक करत असताना अचानक एका रानडुकरांने येऊन या महिलेच्या हाताला चावा घेतला. यावेळी महिलेने बचावासाठी ओरडत असताना शेतात शेजारी राहत असलेल्या नाथाबाई उत्तम राठोड ( वय ६२) या पहावयास गेल्या असताना, या डुकराने नाथाबाई यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांच्या पायाच्या पंजाला तर दुसऱ्या पायाच्या मांडीला चावा घेतला. त्यानंतर या महिलेस जोरदार धडक मारल्याने ही महिला बाजुला असलेल्या दगडावर जाऊन पडल्याने गुडघा निकामी झाला.
या दोन्ही महिलेवर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील नाथाबाई राठोड या महिलेस पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. या महिलेचे दोन्ही पायाचे तीन ऑपरेशन करण्यास सांगितले तर एका ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करावी लागणार असल्याचे या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.