गारपिटीने धारूर तालुक्यात रब्बी पिके भुईसपाट

Spread the love
  • गहू, ज्वारी, हरभरा, कांदा सह फळ बागाचे प्रचंड नुकसान

झटपट बातमी :

धारूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अवकाळी पावसाचा तडाका रब्बी हंगामातील पिकांना बसला. त्यातच आज (शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशी दुपारी तीनच्या दरम्यान अतिवृष्टीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी प्रचंड प्रमाणात वादळी वारे आणि गारपीट झाल्याने रब्बीची गहू, हरभरा, ज्वारी ही हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. तर फळबागा मध्ये आंबा सह फळ बागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

तालुक्यात दि.१७ मार्च रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्या पावसामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१८ रोजी दुपारी धारूर तालुक्यातील भोगलवाडी, चोरंबा ,हिंगणी, सोनीमोहा, मोहखेड, सुरनरवाडी, शिंगणवाडी आधी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊसासह गारपीट झाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये आंबा, फळबाग, गहू, ज्वारी, हरभरा भाजीपाला कांदा आदि पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कमी अधिक प्रमाणात हरभरा पीक काढण्यात आले, मात्र गहू आणि ज्वारी ही पिके सद्यस्थितीत पूर्णपणे काढणी कापणीस आलेली असताना या अवकाळी पाऊस व गारपिटीने नेस्तनाबूत झाली आहेत.
प्रशासनाने या झालेल्या गारपीटीत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी धारूर तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

अंजनडोह येथे वीजपडून बैल दगावला

धारूर तालुक्यात शनिवारी दुपारनंतर विजेच्या कडकडाटसह जोराचा पाऊस झाला यात अंजनडोह येथील शेतकरी नवनाथ शंकर काळे यांचा शेतात असलेला बैल वीज पडून दगावला आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाकडून मदतीची गरज आहे.

Leave a Reply