- जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मुख्याधिकारी निळे यांची मागणी
माजलगाव, दि.६: माजलगाव नगर परिषदेच्या स्थापना १९५४ ची आहे. तेव्हापासून शहराचा एक वेळेस ही सिटी सर्व्हे झालेला नसल्याने शहरातील जागेचे, जमिनीचे मोठ्या प्रमाणात वाद उत्पन्न झालेले आहेत.परिणामी नगर परिषद प्रशासनास दैन दिन कामे, विकास कामे करण्यास अडचणी येत असून नागरिक ही त्रस्त आहेत. त्यामुळे ह्या समस्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी अविनाश निळेकर यांनी चक्क जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे माजलगाव शहराचा सिटी सर्व्हे करण्याची मागणी केल्याचे पत्र झटपट बातमी च्या हाती लागले आहे.

या पत्राद्वारे माजलगाव शहरातील समस्यांचा पाढाच मुख्याधिकारी निळेकर यांनी मांडला आहे. माजलगाव शहरात स्थानिक पातळीवर काम करताना अनेक अडचणी येत आहेत, तसेच जुन्या काळी शहराचा झालेला अनधिकृत विकास व येथे येणाऱ्या अनेक तक्रारीमुळे नागरिकांना व स्थानिक कार्यालयात काम करणारे नगर परिषद व महसूल कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात जर माजलगाव शहराचा सिटी सर्व्हे करून घेतला तर बहुतांश तक्रारी निकाली निघतील. तसेच सामान्य नागरिकांना शासकीय नियमांनुसार विकास करताना येणाऱ्या अडचणी कमी होऊन त्याद्वारे महसूल वाढीचा फायदा होणार आहे. सध्या माजलगाव न.प. हद्दीत मालमत्तेचा तपशील खालील प्रमाणे आहे. त्यात गावठाणातील २ हजार ६७ तर गावठाणा बाहेरील ११ हजार ९१४ मालमत्ता असल्याचे कळवले असून माजलगाव शहराचा सिटी सर्व्हे करणे बाबत प्राधान्याने विचार करावा व योग्य त्या विभागास आदेशित करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
