माजलगाव, दि.१२: माजलगावच्या वीरशैव तरूण मंडळाने, रविवारी (दि.१२) समाजाची स्मशानभूमी असलेल्या रूद्रभूमी मध्ये सामाजिक ऐक्याचे रंग उधळत रंगपंचमी साजरी केली. स्मशानभूमीत असा आगळा वेगळा रंगोत्सव साजरा केल्याने वीरशैव तरूण मंडळाचा हा रंगोत्सव माजलगावकरांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता.

माजलगाव येथील वीरशैव तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गेल्या सहा महिन्यापूर्वी एक दिवस समाजासाठी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून श्रमदानाद्वारे येथील रूद्रभूमीची स्वच्छता केली जात आहे. स्मशानभूमीच्या स्वच्छतेसोबतच तेथे मुलभूत सुविधा समाजाला उपलब्ध करून देण्यासाठी या तरूण मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही नेतृत्वाशिवाय सातत्याने कार्यरत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक रविवारी सकाळी वीरशैव तरूण मंडळाचे कार्यकतेर्र् मोठ्या संख्येने रूद्रभूमीत एकत्र येतात आणि कामाला लागतात. कुणी कुणाला काहीच काम सांगत नाही, प्रत्येकजण आपल्या परीने मिळेल आणि आवश्यक असेल ते कर्य पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळे वीरशैव तरूण मंडळाचा हा उपक्रम आता उपक्रम न राहता ती एक साधना बनली आहे. अविरत पणे केली जाते त्याला साधना म्हणतात आणि अशा साधनेतून अश्यक्यप्राय असलेली कामे देखील साजतेने पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त होतो अशी या तरूणांची धारणा आहे.
माजलगावच्या वीरशैव तरूण मंडळाचा हा आदर्श घेत बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथील आणि परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील वीरशैव तरूणांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. कोणत्याही नेतृत्वाशिवाय सामाजिक ऐक्य साधन्याचा हा मंत्र राज्यातील अन्य समाजबांधवांनी स्वीकारला पाहिजे, अशा प्रतिक्रिया वीरशैव समाजासह अन्य समाजाच्या मान्यवरांकडून देखील व्यक्त केल्या जात आहेत.
रविवारी दि.१२ मार्च रोजी नेहमी प्रमाणेच सकाळी वीरशैव तरूण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमसाधनेसाठी रूद्रभूमीत एकत्र जमले. तीन तासाच्या श्रमसाधने नंतर रंगपंचमीच्या निमित्ताने या तरूणांनी स्मशानभूमीमध्येच उत्साहपूर्ण वातावरणात रंगोत्सव साजरा केला. रंगोत्सवातील रंगांच्या छटा वेगवेगळ्या असल्या तरी त्या सर्वछटा या निमित्ताने सामाजिक ऐकाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. दरम्यान, वीरशैव तरूण मंडळाचा हा रंगोत्सव माजलगवकरांच्या कुतुहल आणि चर्चेेचा विषय बनला होता. या निमित्ताने शहरातील अनेक मान्यवरांनी वीरशैव तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
