आ.सोळंकेच्या पत्नीना अश्रू अनावर !
माजलगाव, दि.८: सोळंके कुटुंबाने व आ.दादांनी कायम सुसंस्कृत पद्धतीने राजकारण केलेले आहे. दहशतीचे राजकारण कधीच केलेले नसून आमच्या दोघांची वयाची ७० ओलांडली असताना ही आम्ही काम करत आहोत. मात्र या वयात दादा व माझ्यावर जीवे मारण्याचा आरोप लाऊन ३०७ सारखा गंभीर गुन्हा दखल होतो. हीच मला मी करत असलेल्या कामाची जागतिक महिला दिनाची भेट आहे का ? असा सवाल उपस्थित करून आ.सोळंकेच्या पत्नी मंगलताई सोळंके यांना गहिवरून आले.
भाजपचे अशोक शेजुळ यांच्यावरील हल्या प्रकरणी आ.प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला होता. याविषयी आज (बुधवारी) मंगलताई सोळंके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे, ॲड.बी.आर.डक यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंगलताई सोळंके म्हणाल्या, माझे सासरे व सोळंके कुटुंबाने दहशतीचे राजकारण केलेले नाही. सरळ, स्वच्छ, सुसंस्कृत राजकारण केलेले आहे. आज कारखाना, शिक्षण संस्था यातून गोरगरिबांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासच आम्ही साधलेला आहे. मागील २५ वर्षापासून पुण्यात माझं शिक्षण झालेलं असताना मी माजलगाव का येतेय, केवळ इतल्या मुलांना, मुलींना चांगले शिक्षण मिळावे. महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात. परंतु ज्या माणसाला काही क्यारॅक्टर नाही अशा माणसाला कशाला मारहाण करू. याचा परिचय काय आहे, वाळू माफिया. इतर धंदे सगळे, सगळे चुकीचेच धंदे असा आरोप नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या भाजपचे अशोक शेजुळ यांच्यावर आरोप केला. तसेच वयाच्या सत्तरीत माझ्या सारख्या महिलेवर ३०७ सारखा जीवे मारण्याचा गुन्हा दाखल होतो. जागतिक महिला दिनी ही मला भेट आहे का ? असा सवाल उपस्थित करून आ.सोळंके यांच्या पत्नी गहिवरून आल्या.