गोविंदवाडी पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनावरून
माजलगाव, दि.५: तालुक्यातील गोविंदवाडी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या उद्घटनावरून श्रेयवादाची लढाई होताना दिसून येत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने खा.प्रितम मुंडेंच्या हस्ते बुधवारी (दि.८) कामाच्या शुभारंभ होणार आहे. मात्र आ.प्रकाश सोळंके यांनी आज (रविवारी) त्या कामाचा शुभारंभ घाई गडबडीत उरकला आहे. यामुळे गोविंदवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी ग्रामपंचायतला जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख ९५ हजार ६३८ रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. ही कामे आत्ता सुरू होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातच गोविंदवाडी ग्रामपंचायत ही सध्या भाजप समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यानुसार सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी या पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ हा जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते बुधवारी दि.८ मार्च रोजी करण्याचे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांनी आज रविवारी दि.५ रोजी या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन उरकले आहे. यावेळी मात्र या उद्घाटन समारंभास सरपंच, उपसरपंच यांनी पाठ फिरवून आ. सोळंके यांच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला.
खासदार, आमदाराच्या भानगडीत आम्हाला नका ओढू !
गोविंदवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनावरून श्रेय वादाची लढाई खासदार व आमदार यांच्यात होत आहे. यात आम्हाला नका ओढू, हा गाव अंतर्गत मामला आहे. आम्ही कर्मचारी, अधिकारी मानस काय बोलणार असे बोलून प्रतिक्रिया देणे टाळले.