-
बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या आंदोलन !
बीड, दि.२ : गावात दारुविक्री होत असल्याने मद्यपींचा सुळसुळाट झाला असून याचा महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस दारु पिणार्यांचा त्रास वाढत असल्याने माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील महिलांनी एकजुट दाखवून आक्रमक पावित्रा घेतला. संतप्त महिलांनी आज (दि.२) गुरुवारी बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या मांडत दारुबंदीची मागणी केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथे दारुविक्री होत असल्याने गावातील तरुण पिढीमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. दारुच्या आहारी जाऊन पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत. याचा विपरीत परिणाम मुलांवर होत असून महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे २८ फेब्रुवारी रोजी गावात झालेल्या ग्रामसभेत गावात दारुबंदी करण्यात यावी. गाव व शिवारात दारुविक्री करणार्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करावा, दारु पिणार्यांवर गुन्हे दाखल करुन ५ ते १० हजारांपर्यंत दंड करावा, दारु विक्री व पिणार्यांची माहिती देणार्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस देणे व त्याचे नाव गुपित ठेवणे. दारुचा मुद्देमाल पकडून देणार्यास पाच हजारांचे बक्षीस देणे, दारुबंदीसाठी महिलांना पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ओळखपत्र देणे, सर्व अवैध धंदे बंद होण्यासाठी दोन महिला व पुरुष पोलिसांनी नियुक्ती करावी, आदी एकूण बारा ठराव घेण्यात आले.
दरम्यान गावातील दारुबंदी करण्यासाठी संतप्त महिलांनी आज (दि.२) गुरुवारी बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आक्रमक रूप धारण केले होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक मस्के यांना निवेदन देण्यात आले. फुलेपिंपळगाव येथील दारुबंदीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मस्के यांनी सांगितले. यावेळी सुनीता कोरडे, रेखा साळवे, सीमा साळवे, वंचाबाई साळवे, मोहन कोरडे, श्रीराम कोरडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.