माजलगाव, दि.२६: वातावरणात सतत होणार्या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किरकोळ आजारात तर वाढ झालीच आहे, मात्र मागील आठवडाभरापासून लहान मुलांमध्ये गोवरचे प्रमाणही वाढले आहे. तीन चार महिन्याच्या बालकांना ही गोवर झाल्याने या आजाराची तीव्रता लक्षात येते. माजलगाव शहरातील फुले नगर भागात अधिक चिमुरडे गोवरने अंगावर येणार्या लाल पुरळांमुळे हैराण झाले आहेत.
यंदा वातावरण बदलामुळे लहान बालके मोठ्या प्रमाणात आजारी पडून दवाखाने हाऊसफुल झाले होते. त्यातच आत्ता गोवरचे प्रमाण वाढल्याचे लहान मुलांच्या दवाखान्यांतील निरीक्षणातून पाहायला मिळत आहे. परंतु स्थानिक आरोग्य विभागाच्या पातळीवर मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. माजलगाव शहरातील दवाखान्यांमध्ये येणारे रुग्ण हे शहरातील फुले नगर भागातील रुग्णाचे प्रमाण अधिक असून इतर भागात ही गोवरणे त्रस्त बालके असल्याचे दिसते.
आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याची गरज …
गोवरचा आजार हा शक्यतो तीन वर्षांआतील बालकांना होतो. आईकडून मिळालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे सहा महिन्यांपर्यंत बाळाला आजार होत नाही; परंतु आता या रोगप्रतिकारक शक्तीचा प्रभावदेखील कमी झाला की काय? असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. तीन महिन्यांच्या बाळामध्येही गोवरची लक्षणे पाहायला मिळू लागली आहेत. यावर तात्काळ असे रुग्ण आहेत, त्या भागात आरोग्य विभागाने सर्वेक्षणाची गरज आहे.
ही असतात लक्षणे?
व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. या आजारात अंगावर लाल पुरळ येते. बहुतांश प्रमाणात चेहरा, मान, छाती, पोट, हात-पायांवर ही पुरळ असते. त्याचप्रमाणे तीन ते चार दिवस नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खोकला येणे, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा ताप येणे आदी लक्षणे आहेत.
ही काळजी घ्या
गोवर रुग्णाच्या संपर्कात कमी जावे. पुरळ येण्याआधी चार दिवस व नंतरचे चार दिवस रुग्णाकडून संपर्कातील व्यक्तींमध्ये या आजाराचा प्रसार होतो. शिंकणे व खोकलण्यातून 90 टक्के संक्रमण होऊ शकते. त्यासाठी अशा रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करणे व लहान मुलांना वेळेवर लसीकरण करवून घेणे गरजेचे असते.