माजलगाव नगर परिषदेचा विशेष लेखा परीक्षण अहवाल तात्काळ सादर करा

Spread the love

– अवर सचिवाचा जिल्हाधिकारी यांना आदेश

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेचा सन २०१७ ते २०२२ या कालावधीचा विशेष लेखा परीक्षण अहवाल तात्काळ सादर करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव नवनाथ रा. वाठ यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. यामुळे तत्कालीन काळात झालेला अनागोंदी कारभार समोर येणार आहे. यात आजी- माजी पदाधिकारी, अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांनी हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित करत माजलगाव नगर परिषदेचे विशेष लेखा परीक्षण करण्याची मागणी केली होती. येथील नगर परिषदेतील दोन वर्षापूर्वीच तीन मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष व चार कर्मचारी यांना जेलवारी करावी लागली होती, ते आत्ता जामिनावर असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. हीच भ्रष्टाचाराची झळ सोसून माजलगाव शांत होतंय न होतंय की, आ.सोळंके यांच्या लेखा परीक्षण करण्याच्या मागणीवरून सन २०१७ ते २०२२ मधील अफहाराचे गाठोडे उघडले जाणार आहे. त्या बाबत महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव नवनाथ रा. वाठ यांनी विशेष लेखा परीक्षण अहवाल स्वयंस्पष्ट व वस्तुनिष्ठ, सविस्तर टिप्पणीसह तात्काळ सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना ३१ जानेवारी २०२२ रोजी दिला आहे.
जिल्हाधिकारी किती दिवसात हे विशेष लेखा परीक्षण करून अहवाल सादर करतात. त्या अहवालात कुठले भ्रष्टाचाराचे गाठोडे उघडले जातेय, त्यात कोण कोण अधिकारी, पदाधिकारी गुंतले जातात. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply