- उद्या महिलांच्या सहभागाने ऐतिहासिक ठरणार रॅली
माजलगाव : शहरात प्रथमच जिजाऊ जन्मोत्सवाची धुरा महिलांनी हाती घेतली आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी … ही हाक देत, माँ जिजाऊ जन्मोत्सव निमित्त उद्या (दि.१२ गुरूवारी) रोजी सकाळी ९ वाजता शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
माँ जिजाऊचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी प्रथमच शहरांसह ग्रामीण भागातील जिजाऊच्या लेकी एकत्र आल्या आहेत. केवळ महिलांनी पुढाकार घेत गुरूवार, दिनांक १२ जानेवारी रोजी शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अनेक महिला एकत्र आल्या असून या रॅलीची तयारी करत आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी शहरातील वार्डावार्डात, ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात महिला बैठका घेत असून गुरूवारी निघणाऱ्या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार उद्या दि.१२ गुरुवारी सकाळी ९ वाजता महिलांचे झांज, ढोलपथकाच्या गजरात झेंडा चौकातून निघणारी रॅली हनुमान चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जाणार असून छत्रपती संभाजी महाराज चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे.
या रॅलीत शहरासह तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रॅली समितीच्या महिलांनी केले आहे.