माजलगाव, दि.७ : जुगार अड्डयावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना तालुक्यातील छत्रबोरगांव येथे यात्रेत घडली असून यात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख योगेश खटकळ जखमी झाले. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यात्रा भरत आहेत. त्याच प्रमाणे छत्र बोरगाव येथे देखील देवीची यात्रा भरली आहे. यात्रास्थळी सुरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठानेप्रमुख योगेश खटखळ यांना मिळाली. यावरून कारवाईसाठी खुद्द खटखळ हे कर्मचाऱ्यांना घेऊन जुगार अड्डयावर पोहचले. जुगार अड्डा बंद करण्यासाठी सांगितले असता पोलीस व जुगार चालक यांच्यात वाद झाला. यावेळी अचानक पोलिसांवर दगडफेक सुरु झाली, यात ठाणेप्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांना जखमी झाले.
ठाणेप्रमुख योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर रावसाहेब जाधव, परमेश्वर विठ्ठल जाधव, अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह इतर अज्ञात १५ ते २० लोकांवर ग्रामीण पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवल हे करत आहेत.
