वन विभागणी तात्काळ जेरबंद करण्याची मागणी
माजलगाव, दि.२९: तालुक्यातील इरला मजरा शिवारात शेतात शेतकरी बाजरीला पाणी देत असताना अचानक समोर काल (मंगळवारी) साय.६ वाजण्याच्या दरम्यान वाघ दिसल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या परिसरात शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री नायब तहसीलदार भंडारी यांनी भेट दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील इरला मजरा हे गाव तालुक्याचे शेवटचे गाव आहे. या भागात माजलगाव धरणाच्या बॅक वॉटर असल्याने मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. इरला मजरा येथील शेतकरी अशोकराव कोटुळे हे शेतात काल मंगळवार दि.२८ रोजी सायं.६ वाजण्याच्या दरम्यान बाजरीला पाणी देत होते. तर त्यांना अचानक पाच सहा फुटांवर वाघ दिसला. वाघाची व त्याची नजरा नजर झाली, मात्र सुदैवाने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि त्यांच्यावर वाघाच्या तावडीतून आपण सुटल्याचे त्यांनी धावत पळत गावात येऊन गावकऱ्यांना सागितले. यावर काही १० ते १२ गावातील लोक पुन्हा कुठे वाघ दिसला हे पाहण्यासाठी आले असता, बाजरी मध्ये पाणी दिलेले असल्याने वाघाच्या पावलाचा मागोसा घेत घेत काही अंतरावर गेले. तर समोर पुन्हा वाघ दिसला, लोकांनी आरडा ओरड केल्याने त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकत, शेजारील असणाऱ्या गेवराई तालुक्यातील चिंचोली शिवारात पळून गेला.
तहसिल प्रशासनास माहिती ग्रामस्थांनी दिली असता रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान नायब तहसीलदार यांनी भेट दिली. वन विभागाचे अधिकारी हे आज दाखल होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
