पत्रकार परिषदेतून आडसकरांचे प्रतिउत्तर
माजलगाव, दि.९: केज मतदार संघाची संस्कृती त्यांना ही माहित आहे, कारण सोळंके कुटुंबाचे अनेक वर्षे वास्तव्य तिथे होते. राहिला प्रश्न रमेश आडसकर कधीच रडीचा डाव खेळत नाही. अशोक शेजुळ यांनी स्वतः हल्ला प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. या मतदार संघात मी काम करत आहे, कोणत्या नागरिकांवर असा प्रसंग आला तर मी त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे रमेश आडसकर यांनी सांगितले.
माजलगाव शहरातील बँक कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आज (गुरुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत रमेश आडसकर बोलत होते. यावेळी बबनराव सोळंके, भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, ज्ञानेश्वर मेंडके, डॉ.भगवान सरवदे, राजेश साळवे, अभय होके पाटील, माणिक दळवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आडसकर म्हणाले, अशोक शेजुळ यांच्यावर झालेला हल्ला इतका गंभीर होता की, मी माझ्या आयुष्यात पहितला नाही. शेजुळ यांच्यावरील हल्यात त्यांचे दोन्ही पाय, दोन्ही हातांना गंभीर इजा झालेली आहे. वृद्ध आई, पत्नी, एक अपंग मुलगी व दोन लहान मुले आहेत. त्या बाबत थोडीशी सहनभुती न दाखवता, सोळंके कुटुंबच विषयाचे विषयांतर करून राजकारण करत आहे. सोळंके कुटूंब हे माझे नाव गुन्हा दाखल मी केला म्हणून गोवून काय साध्य करू पाहत आहेत. शेजुळ यांनीच त्यांच्यावर झालेल्या हल्या बाबत फिर्याद नोंदवली आहे. त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. मी माजलगाव मतदार संघात काम करत असून भाजपचे कार्यकर्तेच काय? इथे कुणावर ही असा प्रसंग ओढवला तर त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे रमेश आडसकर यांनी सागितले.
