माजलगाव : माजलगाव कृषी विभागाच्या वतीने कृषी स्पंदन २०२३ स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात प्रामुख्याने तालुका कृषी विभागाच्या क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.

बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच कृषि स्पंदन २०२३ कृषि क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. यामध्ये सांघिक व वैयक्तिक अशा एकूण ११ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यामध्ये माजलगाव क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात अंबाजोगाई क्रिकेट संघाचा पराभव करून प्रथम पारितोषिक पटकावले.अंतिम सामन्यात राहूल गायकवाड यांनी माजलगावला शतकी खेळीच्या जोरावर एकहाती विजय मिळवून दिला. माजलगाव कबड्डी संघाने उपविभागीय कृषि अधिकारी सूरज मडके यांच्या जोरदार चढायांच्या जोरावर द्वितीय पारितोषिक पटकावले. गजानन राजरपल्लू यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवला. पथसंचलनामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी, माजलगावच्या पथकाने रेशीम शेतीचा अप्रतिम देखावा सादर करीत प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व खेळाडूंनी उपविभागीय कृषि अधिकारी श्री.सूरज मडके व तालूका कृषि अधिकारी श्री शिवप्रसाद संगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम खेळ केला.
