माजलगावचा सुपुत्र डॉ.गौरव वखरेचा संशयास्पद मृत्यू; सी.आय.डी. चौकशी करा

Spread the love
  • माजलगाव तालुका नाभिक समाजाची मागणी

माजलगाव : माजलगाव शहरातील रहिवासी असलेल्या डॉक्टर गौरव राजू वखरे यांचा मृत्यू सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहात झालेला आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद असून याची सी.आय. डी. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजलगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, सोलापुर येथील वसतिगृहमध्ये डॉ. गौरव राजु वखरे यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळुन आला. त्यांची आत्महत्या नसून तो घातपाताचा प्रकार असून याची चौकशी करण्याची पालक सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजु तुकाराम वखरे यांनी मागणी केली आहे. डॉ.गौरव राजु वखरे हा सदरील महाविद्यालयात भुलतज्ञ विषयात (एम.डी.प्रथमवर्ष) मध्ये शिक्षण घेत होता. वृत्तमानपत्रात आत्महत्याच्या बातम्या आल्या असून, गौरव हा नाभिक समाजातील विद्यार्थी आहे व त्याचा घातपात झाल्याचा संशय पालकांनी घेतल्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ या घटनेची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याची मागणी आपल्याकडून शासनास करीत आहे. डॉ.गौरव राजु वखरे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून वखरे कुटूंबीय व समाजास न्याय मिळावा हि अपेक्षा आहे.

 

अन्यथा नाभिक समाज महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दि.२२ बुधवारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शामसुंदर दळवी, नागेश खटले, किशोर दळवी, सागर दळवी, सुनील दळवी, दिलीप झगडे यांच्यासह समाज बांधवांनी केली आहे.

Leave a Reply