तेलगाव जवळ शिवशाही बसचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही …

Spread the love

माजलगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची बस शिवशाही धारूर ते औरंगाबाद धावत असताना तेलगाव जवळ लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना जवळ उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टरचा धक्का लागला. यामुळे चालकाचा ताबा सुटून शिवशाही बस रस्ता दुभाजकावर जाऊन अपघात झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर आगारातून सकाळी ६ वाजता धारूर ते औरंगाबाद शिवशाही बस जाते. दररोज प्रमाणे आज सकाळी ही बस धावत असताना तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना जवळ सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान आली. यावेळी अचानक उसाने भरलेला ट्रॅक्टर (MH23, AI1971) कारखान्याकडे वळल्याने बसच्या (MH09,EM2231)ड्रायव्हर साईडला डिझेल टाकीजवळ ट्रॉली घासली. चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकावर बस धडकत चढली, यात बसचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने बस मधील प्रवाशी व इतर प्रवाशी कुणी जखमी झाले नाही. अपघातस्थळी दिंद्रुड पोलीसांनी भेट दिली असून पुढील कारवाई करत आहेत.

Leave a Reply