भीमा नदीत आढळलेले ते ७ मृतदेह बीड जिल्ह्यातील

Spread the love

पती- पत्नी, मुलगी – जावई व नातवांचा समावेश

गेवराई तालुक्यातील एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह आई, बहीण, मेहुणा यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले होते. आज दि.२४ मंगळवार रोजी दुपारी १ नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. यातील सर्व मयत हे बीड जिल्ह्यातील मोहन उत्तम पवार (वय ५० वर्षे) संगीता मोहन पवार (वय ४५ वर्षे) दोघे रा. खामगाव, ता. गेवराई व त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (वय ३२ वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (वय २७ वर्षे), श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (वय ७ वर्षे), छोटू श्यामराव फुलवरे (वय ५ वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात अकस्माची मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे.

पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे रहाण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय २०) याने त्यांच्याच वडार – समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला १७ जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.

बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाउल

मुलगा अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून माहिती दिली. तुझ्या छोट्या भावाने एका समाजाची मुलगी पळवून नेली आहे. त्यास परत येण्यास सांग, अन्यथा मी कुटुंबासह विष घेऊन आत्महत्या करू असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी मोहन पवार हे त्यांच्या पालासह कुटुंबास घेऊन समाजात बदनामी होईल या भीतीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.

नदीपात्रात केले शोधकार्य

पोलिसांना दि.१८ ते २२ जानेवारी दरम्यान भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील चार मृतदेह मिळून आले होते. घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागल्याने पोलिसांनी एन.डी आर.एफ. पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केल्यावर मंगळवारी आणखी तीन मृतदेह नदीपात्रात सापडले. एकाच कुटुंबातील सातजणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.

Leave a Reply