व्हॉईस ऑफ मीडियाची संकल्पना
माजलगाव – राष्ट्रमाता माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती व दर्पण दिना निमित्त आज (दि.१२ जानेवारी) सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा आवाज बनलेल्या माजलगाव तालुक्यातील ९० पत्रकारांचा अपघाती विमा दैनिक कार्यारंभचे संपादक शिवाजीराव रांजवण यांनी उतरवत सामाजिक दायित्व दाखवून दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर तर तहसीलदार वर्षा मनाळे, सब पोस्टमास्तर दत्तात्रय भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपादक शिवाजीराव रांजवण म्हणाले, कष्टकरी शोषित पीडित समाजाचा आवाज बनलेल्या पत्रकार बांधवांना २४ तास फिल्डवर काम करावे लागते. कधी कोणती अप्रिय घटना होऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही. यामुळे मी माजलगाव, धारूर तालुक्यातील जेवढे पत्रकार आहेत त्यांना माझ्या वतीने दहा लक्ष रुपयाचा अपघात विमा काढण्याचे ठरवले. हा उपक्रम पत्रकराप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून करत असून यात माझा कोणताही हेतू नसून कोणते राजकारणही नाही. ही संकल्पना व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिल्यामुळे मी हा उपक्रम राबवत असल्याचे रांजवण यांनी सांगितले.
तहसीलदार वर्षा मनाळे म्हणाल्या, पत्रकार हे देशाचा चौथा स्तंभ असून माजलगाव येथील पत्रकार सामाजिक कार्यात खूप अग्रेसर आहेत. मात्र याच पत्रकार बांधवांना कुठलेच संरक्षण नसून संपादक शिवाजीराव रांजवण यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तहसीलदार वर्षा मनाळे यांनी कौतुक केले. अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर यांनी केला. पत्रकार बांधवांचा दहा लक्ष रुपयाचा अपघात विमा काढण्यासाठी माजलगाव येथील पोस्टातील सब पोस्ट मास्तर दत्तात्रय भावसार, सुहास राक्षसभवणकर, गिरी पोस्टमास्तर, संदिप काटुळे, दिपशिखा वर्मा यांनी काम पाहीले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यारंभ चे धारूर तालुका प्रतिनिधी सचिन थोरात यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक कार्यारंभचे तालुका प्रतिनिधी तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ घायतिडक, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
