संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली भेट
केज, दि.११ : मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली. देशमुख कुटुंबाची आज (दि.११) रोजी भेट घेऊन त्यांचे सात्वन करत, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणार असून बीडचा बिहार होऊ देणार नसल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
यावेळी आ.सोळंके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता पोलिसांचा असलेला बेजबाबदारपणा आणि आरोपींसोबत असलेले लागेबांधे यामुळे निष्पाप जीव गेला असल्याची माहिती दिली. यावर देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या हत्या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून फाशी देण्यात यावी, याबरोबरच SIT चौकशीची मागणी शासनाकडे करणार आहे. हत्या झाल्या नंतर गुन्हा नोंदवण्यासाठी नागरिकांना तब्बल १३ तास रस्ता रोको करावा लागला, गुन्हा नोंद करण्यासाठी आणि आरोपींना बळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून पोलीस प्रशासन कुठल्या दबावाखाली गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत होते याचीही चौकशी करण्याची मागणी करण्याची आ.प्रकाश सोळंके यांनी आश्वासित केले.