त्या हल्लेखोरांना चार दिवसाची पोलीस कोठडी

Spread the love

अशोक शेजुळ हल्ला प्रकरण

माजलगाव, दि.११: येथील अशोक शेजुळ प्राणघातक हल्ला प्रकरणी चार हल्लेखोर आरोपींना आज (शनिवारी) माजलगाव पोलीसांनी न्यायालयात हजर केले. त्या चार आरोपींना माजलगाव न्यायालयाने चार दिवसाची (दि.१४ मार्च) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर दि.७ मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी माजलगाव ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल होता. पोलीस प्रशासनाने तीन दिवस कसून तपास केला असता यातील चार हल्लेखोर पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळवले. त्यानुसार काल (दि.१०) शुक्रवारी माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात आरोपींना दिले. आज दि.११ शनिवारी दुपारी १ वाजता माजलगाव न्यायालयात हजर केले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी. पौळ यांनी आरोपी अविनाश बाळासाहेब गायकवाड (वय २६ वर्षे) रा. पुनंदगाव ता. माजलगाव, २) संदिप बबन शेळके (वय २२ वर्षे), ३) सुभाष बबन करे (वय २७ वर्षे), ४) शरद भगवान कांबळे (वय २९ वर्षे) रा. पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव यांना चार दिवसा (दि.१४ मार्च) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौकशीतून प्रमुख सुत्रधार येणार समोर

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या चार हल्लेखोरांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीतून होणाऱ्या कसूण चौकशीतून या हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार समोर येणार आहे. त्याकडे आत्ता तो सुत्रधार कोण? याची चर्चा माजलगाव शहरासह मतदारसंघात चर्चिली जात आहे.

Leave a Reply